रुंद वरंबा-सरी टोकण तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर; उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढीचा दावा
नशिराबाद | प्रतिनिधी
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत, उत्पादक आणि किफायतशीर करण्यासाठी आधुनिक कृषी अवजारांचा वापर अत्यावश्यक बनला आहे. याच अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म (जळगाव) येथील कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ इंजि. वैभव सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या ‘बिबिएफ’ (रुंद वरंबा व सरी टोकण) यंत्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास पिकांच्या उत्पादनात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होत असून बियाणे, वेळ आणि मजुरी खर्चातही लक्षणीय बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध पिकांसाठी उपयुक्त यंत्र
ट्रॅक्टरचलित असलेल्या या यंत्राद्वारे कपाशी, सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमूग, मूग, उडीद, ज्वारी तसेच कांदा यांसारख्या पिकांची वरंब्यावर टोकण पद्धतीने अचूक पेरणी करता येते. स्वतंत्र खत व बीज पेटी, विविध बियाणांसाठी बदलता येणाऱ्या तबकड्या, गती नियंत्रण यंत्रणा आणि खोली नियंत्रित करणारी चाके ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत.
आंतरपीक आणि आंतरमशागतीचीही सुविधा
प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बीज व खत पेटी असल्यामुळे आंतरपीक पद्धती सहज राबवता येते. तसेच मुख्य सांगाड्यावर ‘स्वीप’ बसवून यंत्राचा वापर आंतरमशागतीसाठीही करता येतो. त्यामुळे एकाच यंत्रातून अनेक कृषी कामे करता येणे शक्य होते.
जल व्यवस्थापनात प्रभावी
बिबिएफ तंत्रज्ञानामुळे कमी पावसात वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहतो, तर अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी सरीतून बाहेर निघून जाते. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते आणि मुळांची वाढ अधिक चांगली होते.
खर्चात बचत, उत्पादनात वाढ
या यंत्रामुळे पारंपरिक पेरणीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के खर्चात बचत होत असून बियाण्यांचा अचूक वापर होतो. यंत्राची कार्यक्षमता ०.३३ ते ०.३६ हेक्टर प्रतितास इतकी असल्याने कमी वेळेत अधिक क्षेत्राची पेरणी शक्य होते.
यंत्र वापरताना घ्यावयाची काळजी
पेरणीपूर्वी शेताची योग्य मशागत करणे, ट्रॅक्टरचा वेग ३ ते ५ किमी प्रतितास ठेवणे, बीज व खत पेटी वेळोवेळी भरलेली ठेवणे तसेच कामानंतर यंत्राची स्वच्छता व ग्रीसिंग करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढीसोबतच खर्च नियंत्रणावर भर द्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे
