Spread the love

चोरट्यांची निर्भीड कृत्ये सीसीटीव्हीत कैद; पोलिसांसमोर मोठे आव्हान

शिरपूर (धुळे) : शिरपूर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काझी नगर परिसरातील एका प्राध्यापकाच्या घरात चोरट्यांनी भरदिवसा प्रवेश करून तब्बल 50 तोळे सोने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांची संपूर्ण हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भूषण पाटील हे आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असून त्यांच्या पत्नी प्रा. पूजा पाटील या देखील महाविद्यालयात कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी दोघेही नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या गेटवरून उडी मारून आत प्रवेश केला.

यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाट गाठले आणि त्यामधील सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीची घटना साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे शिरपूर शहरात खळबळ उडाली असून, रात्रीच्या चोऱ्यांनंतर आता दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वर्षांच्या कष्टाने जमा केलेली संपत्ती क्षणात गमावल्याने पाटील कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version