धरणगावात विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; मतदार नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन
धरणगाव प्रतिनिधी -वाल्मिक पाटील : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस धरणगाव आणि संविधान जागर अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने SIR (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास धरणगाव शहर व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील यांनी SIR प्रणालीचे महत्त्व विशद केले. समाजातील अशिक्षित घटक, भटक्या-विमुक्त समाज, आदिवासी बांधव, महिला तसेच अल्पसंख्याक नागरिकांना या प्रक्रियेची योग्य माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या घटकांना मदत करून त्यांची नावे मतदार यादीत योग्य पद्धतीने नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संविधान जागर अभियानाचे पूर्णवेळ कार्यकर्ता निखिल रांजणकर यांनी उपस्थितांना SIR प्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यासाठी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारांनी स्वतःची तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती अद्ययावत ठेवावी. आवश्यक कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या सहकार्याने प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात निखिल रांजणकर यांचा परिचय सुनील सोनार यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन महेश पवार यांनी केले.
या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
