संभाव्य दुष्काळ रोखण्यासाठी आतापासून तयारी करा; प्रशासनाने पूर्वनियोजनावर भर द्यावा – स्वप्नील सोनवणे
जळगाव (प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षी एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, संभाव्य दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी नानाश्री फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली.
नानाश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील सोनवणे यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रेरणादायी पुस्तक भेट देत एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. चुकीच्या अफवा आणि अपुऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने प्रशासनाने अधिकृत व शास्त्रीय माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवेदनात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विशेष जनजागृती मोहीम राबविणे, दुष्काळ पूर्वतयारी आराखडा तयार करणे, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करणे, दर्जेदार बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, जलसंधारण व जलपुनर्भरणाची कामे युद्धपातळीवर राबविणे आणि गावनिहाय पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी, संभाव्य पीक नुकसानीसाठी तातडीच्या मदतीची व्यवस्था, जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्धतेचा स्वतंत्र कृती आराखडा, चारा छावण्या व चारा बँकांची पूर्वतयारी, हवामान अंदाज व कृषी सल्ला गावपातळीपर्यंत पोहोचविणे आणि मनरेगा अंतर्गत जलसंधारण व रोजगारनिर्मितीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी बोलताना स्वप्नील सोनवणे म्हणाले, “शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. एल निनोमुळे संभाव्य संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने दुष्काळ जाहीर होण्याची वाट न पाहता पूर्वतयारीवर भर देणे आवश्यक आहे. योग्य वेळी नियोजन झाल्यास शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते.”
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांमार्फत आवश्यक बाबींचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रसंगी नानाश्री फाऊंडेशनचे शुभम सोनवणे, समाधान पाटील, नंदकिशोर सोनवणे, हर्षल राजपूत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
