एस. एस. अहिरे सरांचे हृदयस्पर्शी मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना पितृप्रेम, त्याग आणि संस्कारांची करून दिली जाणीव
तळवेल येथे पितृदिन उत्साहात साजरा • वडिलांच्या त्यागाचे महत्त्व पटवून दिले • “बाप हेच जगातील खरे ज्योतिषी” • विद्यार्थी, शिक्षक आणि पालक भावूक
भुसावळ। संघरत्न सपकाळे (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील नेहरू विद्यामंदिर, तळवेल येथे पितृदिन (फादर्स डे) उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना वडिलांचे प्रेम, त्याग, कष्ट आणि संस्कारांचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमात एस. एस. अहिरे सर यांनी “बाप ओळखता येत नसतो” या विषयावर केलेल्या हृदयस्पर्शी मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालक भावूक झाले. मार्गदर्शन करताना अहिरे सर म्हणाले की, आईप्रमाणेच वडिलांचेही मुलांच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असते. कुटुंबाच्या सुखासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडील आयुष्यभर संघर्ष करत असतात. अनेकदा वडिलांचे प्रेम शब्दांमध्ये व्यक्त होत नाही, मात्र त्यांच्या कृतीतून ते स्पष्ट दिसून येते. स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा बाजूला ठेवून मुलांच्या आनंदासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा माणूस म्हणजे बाप, असे त्यांनी सांगितले.
वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना त्यांनी अत्यंत समर्पक उदाहरण दिले. “बाप हा नारळासारखा असतो. बाहेरून कठोर वाटतो, पण आतून अत्यंत गोड आणि प्रेमळ असतो. जसा मोराला पावसाचे महत्त्व कळत नाही, तसाच अनेक मुलांना जिवंतपणी बापाचा त्याग आणि प्रेम समजत नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आई रडते पण बाप आधार देतो. आई रोजच्या जेवणाची व्यवस्था करते, तर बाप मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी आयुष्यभर पैशांची बचत करतो. मुलांच्या यशात आनंद मानणारा आणि अपयशात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा व्यक्ती म्हणजे बाप होय.
“मनातील वेदना न बोलता सहन करणारा आणि मुलांचे भविष्य ओळखणारा बाप हेच या जगातील खरे ज्योतिषी आहेत,” असे सांगताना त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. तसेच, “माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी काय केले याचा विचार करण्यापेक्षा, मी माझ्या आई-वडिलांसाठी काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण तेव्हा आला, जेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना उद्देशून म्हटले, “घरात देवघर नसले तरी चालेल, स्वतःची स्वतंत्र बेडरूम नसली तरी चालेल; पण आई-वडिलांना म्हातारपणी सुखाने राहता येईल अशी एक छोटी खोली जरूर बांधा.” या शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. टी. रोटे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी आवश्यक बैठक व्यवस्था शाळेतील कर्मचारीवृंदांनी केली. तर आभार प्रदर्शन एस. सी. पाटील सर यांनी केले. पितृदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात वडिलांविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ केली.
