Spread the love

मान्सूनची दमदार हजेरी; रावेर-मुक्ताईनगर तालुक्यांना मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती

कर्की गावाजवळ पुरात बस अडकली • चालकाच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना • घरांमध्ये शिरले पाणी • नागरिकांचे मोठे नुकसान • शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण

संघरत्न सपकाळे । मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात बुधवारी मान्सूनने दमदार हजेरी लावत रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नाले-ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनासमोरही आव्हान उभे राहिले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावाजवळ घडलेल्या घटनेने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेली प्रवाशांनी भरलेली एक खाजगी बस अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकली. नाल्यावरून वेगाने पाणी वाहत असताना बस चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक आलेल्या पुरामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, रावेर तालुक्यातही पावसाने मोठा कहर केला. अनेक गावांमध्ये नाल्यांचे पाणी थेट वस्त्यांमध्ये शिरल्याने घरांसह व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य, धान्य तसेच व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पहिल्याच जोरदार पावसात झालेल्या या नुकसानीमुळे नागरिक हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रभावित नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे काही भागांतील रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. अनेक मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मात्र, या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेवर झाल्याने पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एका बाजूला नागरिकांना पावसाचा फटका बसला असला तरी दुसरीकडे शेतीसाठी हा पाऊस वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version