संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार योजनांचे लाभार्थी अडचणीत; रखडलेले अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी
वृद्धापकाळ अनुदान रखडले • तीन ते चार महिन्यांपासून लाभार्थी प्रतीक्षेत • औषधोपचार व उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर • शासनाकडे तातडीने निधी वितरित करण्याची मागणी
रतन अडकमोल । एरंडोल (प्रतिनिधी): वाढत्या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असतानाच एरंडोल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजनेअंतर्गत अनुदान घेणारे अनेक ज्येष्ठ नागरिक गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनुदानापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. नियमित मिळणारे हे आर्थिक सहाय्य रखडल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून काहींवर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा व्यक्त केली जात आहे.
या योजनांमधून मिळणाऱ्या अनुदानावरच अनेक वृद्धांचा दैनंदिन खर्च अवलंबून आहे. नियमित उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने औषधोपचार, अन्नधान्य, वीजबिल आणि इतर अत्यावश्यक गरजा भागविताना त्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असताना अनुदान वेळेवर न मिळाल्याने त्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.
अनेक लाभार्थ्यांनी संबंधित शासकीय कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याची तक्रार केली आहे. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
सामाजिक सुरक्षा योजनांचा उद्देशच निराधार, गरजू आणि वृद्ध व्यक्तींना आर्थिक आधार देण्याचा आहे. मात्र अनुदान वितरणात होत असलेल्या विलंबामुळे या योजनांचा उद्देशच धोक्यात आल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून संबंधित विभागाला तातडीच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वृद्धांच्या जीवनाशी संबंधित या योजनेत होणारा विलंब त्यांच्या आरोग्याबरोबरच सन्मानाने जगण्याच्या अधिकारावरही परिणाम करत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
“गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वृद्धापकाळ योजनेचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने उसनवारी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. शासनाने रखडलेले अनुदान तातडीने जमा करून पुढे नियमितपणे अनुदान द्यावे.”
– कलाबाई सपकाळे, लाभार्थी, खेडी खुर्द
