शेतशिवार रस्ता मोकळा करण्याची तातडीची मागणी; रस्त्याअभावी बियाणे, खते व शेती अवजारे शेतात नेण्यात अडचणी
रतन अडकमोल। एरंडोल ग्रामीण प्रतिनिधी :
पावसाळ्याला सुरुवात होताच खरीप हंगामातील पेरणीची लगबग वाढली आहे. मात्र एरंडोल तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था किंवा रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणीसाठी आवश्यक बियाणे, खते, शेतीची अवजारे तसेच ट्रॅक्टर व पेरणी यंत्रे शेतापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्याअभावी अनेक शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची पोती डोक्यावर किंवा छोट्या वाहनांच्या मदतीने शेतात न्यावी लागत आहेत. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असून खर्चातही मोठी वाढ होत आहे. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा शेतरस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्त्यांची मागणी करण्यात आली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पेरणीचा हंगाम लक्षात घेऊन शेतशिवार रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, रवंजे गावातील शेतकऱ्यांनाही अशाच समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतशिवाराकडे जाणारा रस्ता बंद असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. “शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पेरणी कशी करायची?” असा संतप्त सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर रवंजे येथील शेतकऱ्यांनी एरंडोल प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत शेतशिवाराचा रस्ता तातडीने मोकळा करून देण्याची मागणी केली आहे. पेरणीपूर्वी रस्ता उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर दौलत भिला कुंभार, साहेबराव गणपत कोळी, रवींद्र तान्हू कोळी, दीपक हिम्मत पाटील, कैलास संपत कोळी, भगवान बुधा कोळी, प्रकाश तान्हू कोळी, अशोक नामदेव कोळी आणि गोकुळ तुळशीराम कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतशिवार रस्ता मोकळा करावा, अन्यथा खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
