संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार योजनांचे लाभार्थी आर्थिक संकटात; रखडलेले अनुदान तातडीने देण्याची मागणी
रतन अडकमोल। एरंडोल ग्रामीण प्रतिनिधी : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच एरंडोल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजनेअंतर्गत वृद्धापकाळ अनुदान घेणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेक वृद्धांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
अनेक ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च हा केवळ शासनाच्या वृद्धापकाळ अनुदानावरच अवलंबून आहे. मात्र नियमित अनुदान न मिळाल्याने औषधोपचार, अन्नधान्य, वीजबिल तसेच इतर अत्यावश्यक गरजा भागविणे कठीण झाले आहे. उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसल्यामुळे अनेक वृद्धांना उसनवारी करून किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेऊन उदरनिर्वाह करावा लागत असल्याचे चित्र आहे.
लाभार्थ्यांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नसल्याची तक्रार आहे. अनुदान वितरणातील या विलंबामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महागाईच्या झळा सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना बसत असताना, वृद्धापकाळ अनुदानच त्यांच्यासाठी जगण्याचा आधार ठरत आहे. मात्र तीन ते चार महिन्यांपासून ही रक्कम न मिळाल्याने अनेकांना औषधोपचारही थांबवावे लागत असून दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत प्रलंबित अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कलाबाई सपकाळे (रा. खेडी खुर्द) म्हणाल्या,
“गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वृद्धापकाळ योजनेचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने उसनवारी करून दिवस काढावे लागत आहेत. शासनाने नियमितपणे वृद्धापकाळ योजनेचे अनुदान खात्यात जमा करावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने रखडलेले अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी आता लाभार्थी आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.
