तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला; उपक्रमाला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने काळाचौकी पोलीस ठाण्यात सोमवार, २२ जून २०२६ रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
दैनंदिन तणावपूर्ण आणि धावपळीच्या कामकाजामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेत पोलीस कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. तसेच विविध आजारांबाबत मार्गदर्शन, आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
या शिबिरात डॉ. प्रागजी वाजा, डॉ. वैशाली शेलार, डॉ. सुनीता निकम, डॉ. शशिकांत पवार, डॉ. अजय पुरी, डॉ. मुकुंद धोत्रे, डॉ. गुलाब गुप्ता आणि डॉ. रोहन राम ठाकूर यांनी वैद्यकीय सेवा देत पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, विभागीय नगरसेविका सुप्रिया दळवी तसेच मनसेच्या पदाधिकारी ग्रेसी सिंग यांनी उपस्थिती लावली. यावेळी महिला पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस उपनिरीक्षक सागर बनकर तसेच सपोनि हसन मुलाणी यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व समजावून देण्यात आले.
पोलीस दल समाजाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत असते. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे मोफत वैद्यकीय शिबिर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरले असून, भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
