Spread the love

“लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान सहन केला जाणार नाही”; पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी

धरणगाव | प्रतिनिधी – वाल्मिक पाटील

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कथितरित्या धमकीची व अपमानास्पद भाषा वापरल्याच्या घटनेचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

पत्रकार संघाच्या बैठकीत पत्रकार जितेंद्र महाजन यांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता हा चौथा स्तंभ असून शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पत्रकार सातत्याने जनतेचे प्रश्न, समस्या आणि वास्तव परिस्थिती समोर आणण्याचे कार्य करतात. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी आक्षेपार्ह भाषेत संवाद साधणे ही लोकशाही मूल्यांना धक्का देणारी बाब आहे.

मुंबई येथे काही पत्रकार बातमी व मुलाखतीसाठी गेले असताना त्यांच्याशी कथितरित्या अपमानास्पद भाषा वापरण्यात आली. तसेच “माझ्या नादाला लागला तर एकतर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल” आणि “पुन्हा समोर आल्यास मारून पाठवणार” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य केवळ पत्रकारांचाच नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेचाही अवमान असल्याचे पत्रकार संघाने म्हटले आहे.

पत्रकारांनी प्रश्न विचारल्यामुळे त्यांना धमकावणे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे आणि दहशत निर्माण करणारी भाषा वापरणे हा लोकशाही प्रक्रियेवर आघात असल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. अशा घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले.

धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, कोणतीही व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही. पत्रकारांना निर्भयपणे आणि निष्पक्षपणे काम करता यावे, हे लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी धरणगाव अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद रोकडे, ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. व्ही. एस. भोलाणेजितेंद्र महाजननिलेश पवारपी. डी. पाटीलॲड. हर्षल चौहानविकास पाटीलरविंद्र कंखरेसुधाकर मोरेराजू बाविस्करसतीश शिंदेॲड. स्वप्नील भाटियासतीश बोरसेकिरण चव्हाणमनोज महाजनवाल्मिक पाटीलविनोद मोरे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version