दक्ष पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा आयुक्तांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा, न्याय न मिळाल्यास अधिवेशनातही आंदोलनाचा निर्धार
सुनील निकम | प्रतिनिधी :
धुळे शहरातील जगन्नाथ नगर परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मंडाबाई रघुनाथ भाले यांचे अतिक्रमण असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने घर पाडल्याच्या प्रकरणावरून आता आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. पीडित कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करत दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीने मंडाबाई भाले यांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी केली असून, अन्यथा सोमवारपासून धुळे महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ‘बिऱ्हाड आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.
मंडाबाई भाले यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर कारवाई करताना घराची तोडफोड केली, मालमत्तेचे नुकसान केले तसेच जातिवाचक शिवीगाळही केली. या घटनेनंतर ९ जूनपासून संबंधित कुटुंबीयांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई अथवा पुनर्वसनाची प्रक्रिया झालेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल आणि वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहरात अनेक प्रभावशाली व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई न करता दलित व मुस्लिम समाजातील गरीब नागरिकांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी कथित अतिक्रमणांची यादी महापालिका आयुक्तांना दिल्याचा दावा करत, “धनदांडग्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची हिंमत प्रशासन दाखवणार का?” असा सवाल उपस्थित केला. प्रशासनाने निवडक कारवाई न करता सर्वांसाठी समान न्यायाची भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मंडाबाई भाले या वृद्ध महिलेचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा सोमवारपासून मनपा आयुक्त कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. याशिवाय, धुळे येथे आंदोलन करूनही न्याय न मिळाल्यास मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धारही बापू बागुल आणि शंकर खरात यांनी व्यक्त केला.
