Spread the love

पत्रकारांना धमकावणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात; सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन सादर

नशिराबाद | प्रतिनिधी

पत्रकारांना कथितरित्या अश्लाघ्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना, नशिराबाद पत्रकार संघानेही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या आणि दबावाचे प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना धमकावणे म्हणजे केवळ पत्रकारांचाच नव्हे, तर संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही अवमान असल्याचे पत्रकार संघाने स्पष्ट केले.

पत्रकार संघाने म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींनी लोकशाही मूल्यांचा आदर राखणे अपेक्षित असताना पत्रकारांना धमकावणे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.

यावेळी पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाला निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी पत्रकार संघाचे निवेदन स्वीकारत ते तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल तसेच कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी नशिराबाद पत्रकार संघाचे सुनील भावसार, प्रा. विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, हरीश पाटील, सुनील महाजन, सागर मोरे यांच्यासह परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांना कथित धमकी देणाऱ्या खासदारावर कारवाईची मागणी करत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन सादर करताना नशिराबाद पत्रकार संघाचे पदाधिकारी.

Share.
Leave A Reply

Exit mobile version