Spread the love

मुंबईतील लाल डोंगर येथील निवासस्थानी भेट; दिवंगत अक्षय घोडेस्वार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वाहिली श्रद्धांजली

जामखेड | प्रतिनिधी (बापुसाहेब घोडेस्वार)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मुंबई लाल डोंगरचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप एकनाथ घोडेस्वार यांचे सुपुत्र तथा बुद्धवाशी अक्षय उर्फ बंटी दिलीप घोडेस्वार यांच्या निधनानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी घोडेस्वार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मुंबईतील लाल डोंगर, एस.टी. रोड येथील अशापुरा बिल्डिंगच्या बी विंगमधील घोडेस्वार कुटुंबाच्या निवासस्थानी शनिवारी (दि. २० जून) रात्री सुमारे ९ वाजता रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दिवंगत अक्षय (बंटी) घोडेस्वार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत या दुःखद प्रसंगात धीर दिला.

अक्षय उर्फ बंटी घोडेस्वार (वय ३०) यांचे १६ जून २०२६ रोजी मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे घोडेस्वार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर चेंबूर येथील चारई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांत्वन भेटीदरम्यान आरपीआयचे मुंबई प्रदेश संघटक रमेश घोक्षे, चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड, १५५ वॉर्ड अध्यक्ष दिलीप लागडे, पनवेल (सुकापूर) येथील माजी ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा अभिषेक घोडेस्वार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अक्षय उर्फ बंटी घोडेस्वार यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील, भाऊ, वहिनी, बहिणी तसेच विस्तृत आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version