Spread the love

पूर्णवेळ एसआयआर नियुक्तीमुळे अध्यापनावर परिणाम; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार, शिक्षक-पालकांचा सवाल

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील शिक्षकांना मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी पूर्णवेळ नियुक्त करण्याच्या आदेशांमुळे शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “जर शासनाला एसआयआरचे कामच अधिक महत्त्वाचे वाटत असेल, तर शाळाच बंद करा आणि शिक्षकांना केवळ बीएलओची जबाबदारी द्या,” अशा शब्दांत विविध शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षकांना निवडणूक कामासाठी सातत्याने वर्गाबाहेर पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता शिक्षक आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

धारावी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी २५ जून रोजी अनेक अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून २९ जूनपासून मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत शिक्षकांना पूर्णवेळ एसआयआर कामासाठी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. शारदाश्रम, बालमोहनसह अनेक नामांकित शाळांतील शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित अध्यापनाचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून सातत्याने शिक्षकांची बीएलओ आणि एसआयआर कामासाठी नियुक्ती केली जात आहे. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, मूलभूत साक्षरता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असताना शिक्षकांना वारंवार निवडणुकीच्या कामात गुंतवणे ही विरोधाभासी भूमिका असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “बहुतांश शिक्षक निवडणुकीच्या कामात गुंतले असताना विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार कोण? गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरणारे शासनच शिक्षकांना वर्गाबाहेर पाठवत असेल, तर त्याचा फटका विद्यार्थ्यांनाच बसणार आहे.”

‘शिक्षक भारती’ बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष विजयकुमार गोकुळ पाटील यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “जर एसआयआरचे काम इतकेच महत्त्वाचे असेल, तर शिक्षकांना पूर्णवेळ त्याच कामासाठी द्या. अनेक शिक्षक मुंबईबाहेर राहतात. शाळा आणि एसआयआर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. शासनाला शाळा चालवायच्या नसतील, तर त्या बंद कराव्यात. शिक्षकांशिवाय वर्ग कोण चालविणार? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

समर्थ शिक्षक संघटनेचे मुंजा गिरी यांनीही शिक्षकांवर वाढत असलेल्या अशैक्षणिक कामाच्या ओझ्याबाबत नाराजी व्यक्त करत, अध्यापनावर होणाऱ्या परिणामाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर पालकांनीही चिंता व्यक्त केली आहे. पालक शंकर पान म्हणाले, “ज्या शाळेत आमची मुले शिकतात, त्या वर्गात शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार? राज्यघटनेने प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. तो अबाधित राहिला पाहिजे.”

दरम्यान, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नियमित कामकाज सांभाळून हे काम करावे लागते. “शिक्षकांच्या अडचणींबाबत अद्याप कोणत्याही संघटनेकडून अधिकृत निवेदन प्राप्त झालेले नाही. निवेदन प्राप्त झाल्यानंतर त्यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना वारंवार अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, एसआयआर मोहिमेसाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून शिक्षकांना त्यांच्या मूळ अध्यापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडू द्याव्यात, अशी मागणी आता शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version