रेल्वे वॉर्डातील सम्यक विहार चौकात प्रतिमापूजन, माल्यार्पण व प्रबोधनपर मार्गदर्शन
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील रेल्वे वॉर्ड परिसरातील सम्यक विहार चौक येथील सम्यक बुद्ध विहारात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित कार्यक्रमात सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयु. डी. झेड. मोरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर आयु. प्रा. निखिल रांजणकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात आयु. श्रावणबाबा सपकाळे, आयु. रवींद्र निकम आणि रवींद्र बाविस्कर यांच्या हस्ते आयु. डी. झेड. मोरे व प्रा. निखिल रांजणकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. निखिल रांजणकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, शिक्षणप्रसार, आरक्षण आणि बहुजन कल्याणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरणादायी विचार दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. यशवंतराव मोरे, रोहित शिरसाट, विजय सुरवाडे आणि अशोक सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयु. जितेंद्र सोनवणे यांनी केले.
मोठ्या संख्येने उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण करत सामाजिक समता आणि बंधुत्वाचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
