Spread the love

कृष्ण गीता नगरवासीयांची संवेदनशीलता ठरली जीवनदायी; सामाजिक बांधिलकीचा धरणगावकरांनी घालून दिला आदर्श

धरणगाव | प्रतिनिधी – वाल्मिक पाटील

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जीवनशैलीत माणुसकीची अनेकदा कमतरता जाणवते. मात्र धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरातील नागरिकांनी एका अनोळखी, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि असहाय्य व्यक्तीला मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. नागरिकांच्या संवेदनशीलतेला धरणगाव पोलिसांच्या तत्परतेची जोड मिळाल्याने सिक्कीममधील हरवलेल्या व्यक्तीची अखेर त्याच्या कुटुंबीयांशी सुखरूप भेट घडून आली.

सिक्कीम राज्यातील वेस्ट सिक्कीम जिल्ह्यातील सित्तम येथील रहिवासी नारायण जीत कामी (वय ३९) हे मानसिक स्थिती बिघडल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून घरापासून दूर भटकत होते. भटकता-भटकता ते धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरात आले. रात्रीच्या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांकडे जेवण व पाण्याची मागणी केली.

त्यांची अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष न करता त्यांना जेवण-पाणी देऊन आधार दिला. यावेळी महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक पी. डी. पाटीलएस. एन. कोळी तसेच मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो फक्त तोडक्या हिंदीत बोलत असल्याने संवादात अडचणी येत होत्या. मात्र संयमाने विश्वास संपादन करत त्याच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर पत्रकार पी. डी. पाटील यांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ तसेच धरणगाव पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कदम तसेच पोलीस कर्मचारी सुमित बाविस्कर, योगेश पाटील, गुलाब महाजन आणि समाधान भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी प्रेमाने संवाद साधल्यानंतर नारायण कामी यांनी आपल्या घरचा मोबाईल क्रमांक सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांची बहीण दिया नरबहादुर या मुंबईतील बांद्रा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांना तात्काळ संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली.

दरम्यान, पोलीस ठाण्यात नारायण कामी यांच्यासाठी जेवण व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. रात्रीच त्यांचे नातेवाईक मुंबईहून धरणगावकडे रवाना झाले. दुसऱ्या दिवशी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नारायण कामी यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या हरवलेल्या नातेवाईकाची सुखरूप भेट झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी धरणगाव पोलीस, पत्रकार आणि कृष्ण गीता नगर परिसरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

‘आपल्याला काय देणे-घेणे’ अशी भावना वाढत असलेल्या काळात कृष्ण गीता नगरातील नागरिकांनी जाती, भाषा आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन एका अनोळखी व्यक्तीला दिलेला आधार हा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देण्यासाठी मोठ्या साधनांची नव्हे, तर संवेदनशील मनाची गरज असते, हे धरणगावकरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. या घटनेमुळे धरणगाव पोलिसांच्या संवेदनशील कामगिरीचे तसेच नागरिकांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version