Spread the love

गेल्या तीन महिन्यांतील दुसरी घटना; नैसर्गिक प्रसूती यशस्वी करून डॉक्टरांच्या कौशल्याचे कौतुक

शिरपूर | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका गरोदर महिलेने एकाचवेळी तीन सुदृढ बाळांना जन्म दिल्याची दुर्मीळ आणि आनंददायी घटना घडली आहे. आईसह तिन्ही नवजात बालके सुखरूप असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती प्रसूती करणारे डॉ. रणजीत पावरा यांनी दिली.

मूळच्या पनाखेड येथील आणि सध्या शिरपूर तालुक्यात वास्तव्यास असलेल्या निर्मला मोरे यांची शिरपूर येथील एका खासगी रुग्णालयात यशस्वी प्रसूती करण्यात आली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असूनही सिझेरियनऐवजी नैसर्गिक पद्धतीने प्रसूती यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.

या प्रसूतीमध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे वजन दीड किलो, दुसऱ्या बाळाचे वजन सुमारे सव्वादोन किलो, तर तिसऱ्या बाळाचे वजन दीड किलो असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तिन्ही बाळांची प्रकृती स्थिर असून आईची प्रकृतीही समाधानकारक आहे.

एकाचवेळी तीन बाळांचा जन्म झाल्यामुळे मोरे कुटुंबात आनंदाचे वा

तावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांत शिरपूरमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना घडल्याने जिल्हाभरात या घटनेची चर्चा रंगली आहे.

अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसूतीमध्ये नैसर्गिक पद्धतीचा यशस्वी अवलंब करून आई व तिन्ही बाळांचे प्राण सुरक्षित राखल्याबद्दल डॉ. रणजीत पावरा आणि त्यांच्या वैद्यकीय पथकावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version