Spread the love

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज निवासी विद्यालयाची उभारणी; डॉ. भगवान तलवारे यांच्या प्रयत्नांना यश

अमळनेर | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागांतर्गत मान्यताप्राप्त ‘स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालय’ या निवासी विद्यालयाच्या नव्या वास्तूचे लोकार्पण अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास आणि सर्वांगीण विकासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारण्यात आला आहे.

कै. बापूसो एन. झेड. मराठे अनाथ मतिमंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सह-चेअरमन तसेच स्पेशल ऑलिम्पिक भारत, महाराष्ट्रचे एरिया डायरेक्टर डॉ. भगवान तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक प्रयत्नांतून या विद्यालयाची उभारणी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विविध विभागांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्य वास्तूचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी. सी. म्हस्के यांच्या हस्ते झाले. कार्यालयाचे उद्घाटन शिक्षण सभापती नावेद अहमद मुर्शिद शेख, वसतिगृहाचे उद्घाटन रामकृष्ण पाटील, फिजिओथेरपी कक्षाचे उद्घाटन भरत ललवाणी, शिघ्र निदान व हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन विश्वनाथ पाटील, पूर्व प्राथमिक विभागाचे उद्घाटन नरेंद्र संधानशिव, क्रीडा विभागाचे उद्घाटन अभिषेक पाटील, रिक्रिएशन हॉलचे उद्घाटन प्रताप साळी, स्वयंपाकगृहाचे उद्घाटन निलिमा पाटील, तर गणवेश व स्टेशनरी वाटपाचा शुभारंभ महेशबापू शेख यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून डॉ. प्रसन्न जोशी व डॉ. उर्वी जोशी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. भगवान तलवारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉ. तलवारे व त्यांच्या कुटुंबीयांनीही सर्व मान्यवरांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली.

या लोकार्पण सोहळ्यास उपसरपंच दीपक जमादार, माजी सरपंच प्रशांत पाटील, भरत मराठे, रमेश मराठे, अजितसिंह जमादार, धनराज मराठे, गणेश चौधरी, मंगलाबाई कोळी, छायाबाई शिरसाठ, अर्चना पाटील, रेखाबाई कोळी, प्रतिभा कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. भगवान तलवारे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा दर्जेदार निवासी संस्थांची गरज अधोरेखित करत समाजाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. हा प्रकल्प दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version