Spread the love

चार हजारांहून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा अद्वितीय सोहळा

पाळधी / जळगाव | प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला. जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानकापर्यंत निघालेल्या पालखी-दिंडीने संपूर्ण जळगाव शहर विठ्ठलनामाने दुमदुमून गेले.

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे. विठ्ठलाने मला केवळ निमित्त बनविले, हेच माझे भाग्य आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर होते.

जी.एस. ग्राऊंडवर दुपारपासून हजारो वारकरी एकत्र जमले होते. नोंदणीकृत भाविकांना ओळखपत्रे, प्रवास पास, आवश्यक साहित्य तसेच संपूर्ण प्रवासाची माहिती देण्यात आली. त्यानंतर नेहरू चौक मार्गे रेल्वे स्थानकापर्यंत निघालेल्या पालखी-दिंडीत टाळ, मृदंग, वीणा, अभंग, फुगड्या, रिंगण आणि हरिनामाच्या अखंड गजरात वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः टाळ हातात घेऊन दिंडीत सहभाग नोंदवला. रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन त्यांनी वारकऱ्यांची विचारपूस केली. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग भाविक तसेच इतर वारकऱ्यांच्या सुविधांची पाहणी करून रेल्वे सुटेपर्यंत ते स्थानकावर उपस्थित राहिले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि GPS मित्र परिवाराने केले. नोंदणी, रेल्वेतील आसनव्यवस्था, डॉक्टरांचे पथक, प्रथमोपचार पेट्या, पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन, स्वयंसेवक, पंढरपूरमधील निवास, महाप्रसाद, दर्शन व्यवस्था आणि परतीच्या प्रवासाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले.

प्रत्येक रेल्वे डब्यात दोन स्वयंसेवक, वैद्यकीय मदत, औषधे, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी निवास, चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, समाधान महाराज भोजेकर, ज्ञानेश्वर महाराज, परमेश्वर महाराज पाळधीकर, पांडुरंग महाराज, अनिल महाराज, मयूर महाराज, गजानन महाराज धरणगावकर, मंगलसिंग महाराज, लाला महाराज, विठोबा महाराज, कृष्णा महाराज यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक, टाळकरी, माळकरी आणि हजारो वारकरी उपस्थित होते.

विशेष रेल्वेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत निरोप दिल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्थानक “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या जयघोषाने दुमदुमून गेले.

चौकट १ : ‘विठू माऊली तू…’ गीताने भारावले हजारो वारकरी

जी.एस. ग्राऊंडवरील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः “विठू माऊली तू माऊली जगाची…” हे विठ्ठलभक्तीपर गीत सादर केले. त्यांच्या स्वरांना हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात उत्स्फूर्त साथ दिली. काही क्षणांतच संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड नामगजराने दुमदुमून गेला. अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि भक्ती, श्रद्धा व समर्पणाचा अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला.

  • जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक… भक्तीचा महासागर

जी.एस. ग्राऊंडवरून निघालेली पालखी-दिंडी हा कार्यक्रमाचा सर्वात आकर्षक भाग ठरला. हजारो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात नाचत होते. महिला फुगड्या खेळत होत्या, तर वारकरी रिंगण घालत अभंग गात पुढे सरकत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतापराव पाटील, विकी पाटील आणि गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासोबत फुगडी खेळत दिंडीत सहभाग घेतला. जळगावकरांनी ठिकठिकाणी दिंडीवर पुष्पवृष्टी करून वारकऱ्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

  • प्रतापराव पाटील व GPS मित्र परिवाराचे सूक्ष्म नियोजन.
  • जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक भव्य पालखी-दिंडी.
  • पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दिंडीत प्रत्यक्ष सहभाग.
  • प्रत्येक रेल्वे डब्यात डॉक्टर, प्रथमोपचार पेटी व स्वयंसेवक.
  • पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन व चहाची संपूर्ण व्यवस्था.
  • पंढरपूर येथे निवास, महाप्रसाद, चंद्रभागा स्नान, दर्शन व हरिकीर्तनाची सुविधा.
  • सर्व वारकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला.
  • विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप.

     

Share.
Leave A Reply

Exit mobile version