Spread the love

ॲड. प्रबुद्ध माळी, ॲड. सुशांत जगताप व आदित्य शिंदे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप

बोरघर / माणगाव (विश्वास गायकवाड) : बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका शाखा तळा आणि बौद्धजन पंचायत समिती, तालुका शाखा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत मोरे होते.

यावेळी सामाजिक बांधिलकी जपत ॲड. प्रबुद्ध माळी, ॲड. सुशांत जगताप आणि आदित्य शिंदे यांच्या पुढाकारातून इयत्ता पहिली ते दहावी तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक रामदास शिंदे यांनी केले, तर सूत्रपठण विशाखा शिंदे, गणपत जगताप आणि भास्कर गवाणे यांनी केले.

यावेळी ॲड. सुशांत जगताप, ॲड. प्रबुद्ध माळी, ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश माळी आणि पल्लवी सकपाळ यांनी मार्गदर्शन करताना राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, शिक्षण प्रसार आणि बहुजन कल्याणासाठीच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सुरेंद्र शेलार यांनी केले. कार्यक्रमाला तालुका महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, सुमन सकपाळ, मीना नाक्ते, अनिता सकपाळ, मंदा गायकवाड, महादेव जगताप, परशुराम गायकवाड, चांगदेव गवाणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप यश जवलकर यांनी उपस्थितांचे आभार मानून केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version