Spread the love

भुसावळ रेल्वे स्थानकावरील घटना; डोळ्याखाली गंभीर दुखापत, ₹88 हजारांचे नुकसान, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असलेल्या रेल्वेच्या टीटीईवर एका प्रवाशाने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना शनिवारी (२७ जून) रात्री घडली. एसी कोचमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपीने टीटीईला शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यात टीटीईच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला असून सरकारी टॅब, चष्मा, ईएफटी बुक आणि सोन्याची साखळी यासह सुमारे ₹88 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी मनीष लक्ष्मणदास शंभानी (वय 36, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुन्नीलाल रमेशचंद्र गुप्ता (वय 49) हे भुसावळ येथे हेड टीटीई म्हणून कार्यरत असून शनिवारी रात्री नागपूर–मडगाव एक्सप्रेस (गाडी क्र. 11203) मध्ये भुसावळ ते पनवेल दरम्यान एसी कोच तपासणीची ड्युटी बजावत होते.

रात्री सुमारे 10.20 वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आल्यानंतर आरोपीने एसी कोचमध्ये जागा देण्याची मागणी केली. मात्र, गाडीत आरएसी प्रवासी असल्याने जागा उपलब्ध नसल्याचे टीटीईने सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने प्रथम अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर टीटीई दुसऱ्या प्रवाशाशी बोलत असताना अचानक त्यांच्या छातीवर, बरगड्यांवर तसेच चेहऱ्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 448/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 132, 352, 351(2), 115(2) आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार धनराज सुधाकर लुले करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version