Spread the love

सामाजिक समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश; युवकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

धुळे | प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त धुळे शहरात शुक्रवारी (दि. २६ जून) संघर्षपती एक राष्ट्रशक्ती अभियानच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला.

रॅलीची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (एस.टी. स्टँडजवळ) येथून झाली. त्यानंतर देवपूर परिसर, नवीन महापालिका, जुनी महापालिका, पारोळा रोड आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

यावेळी सहभागी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला मानवंदना अर्पण केली.

रॅलीच्या माध्यमातून शिक्षण, सामाजिक समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयोजकांनी सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करून समाजात एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या भव्य बाईक रॅलीला धुळेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version