ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
जामखेड। बापुसाहेब घोडेस्वार | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील साकत येथील स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी व डी. फार्मसी महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या २०२६ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाने प्रथम वर्षात शंभर टक्के, तर द्वितीय वर्षात ९८ टक्के निकालाची परंपरा कायम राखत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे.
निसर्गरम्य वातावरणात उभारण्यात आलेल्या या महाविद्यालयाची स्थापना साकतचे भूमिपुत्र प्रा. अरुण वराट आणि त्यांचे बंधू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास वराट यांनी ग्रामीण भागातील, विशेषतः शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केली आहे.
प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थी म्हणून शुभांगी भोसले (७३.९० टक्के) यांनी प्रथम क्रमांक, मिथाली आगे (७३.६० टक्के) यांनी द्वितीय, तर अनुष्का बोडके (७१.९० टक्के) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सिमरण शेख (७१.३० टक्के) आणि सतीश चव्हाण (७१.१० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले.
द्वितीय वर्षात सुशेन कोठुळे (७८.३६ टक्के) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सोनाली निकम (७४.७३ टक्के) द्वितीय, सुषमा सपकाळ (७३.०० टक्के), सलमान पठाण (७२.९१ टक्के) आणि उज्वला टेकाळे (७२.०९ टक्के) यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, सचिव कैलास वराट, प्राचार्य गोरक्ष बारगजे, सर्व संचालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
