Spread the love

नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; ७,७७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

नशिराबाद | धीरज सैतवाल, प्रतिनिधी

नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रविवारी (दि. २८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान २०२६ उत्साहात व यशस्वीरित्या राबविण्यात आले. पोलिओमुक्त भारताच्या उद्दिष्टाला बळ देणाऱ्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मोहिमेचा शुभारंभ नशिराबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला. यावेळी त्यांनी पालकांना आवाहन करताना, “दोन थेंब जीवनाचे – प्रत्येक बालकाच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी अत्यावश्यक आहेत. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे डोस अवश्य पाजावेत,” असे सांगितले.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण ७,७७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला असून ९६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात ३७ विशेष पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते.

ही मोहीम जिल्हा परिषद जळगावचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांधारे यांचेही मार्गदर्शन लाभले. नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भडाडे यांनी संपूर्ण मोहिमेचे प्रभावी नियोजन व नेतृत्व केले.

आरोग्य विभागाच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे मोहिमेला यश मिळाले असून, नशिराबाद परिसरातील बालकांचे आरोग्य अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version