वेळेवर झालेल्या पावसाने दिला दिलासा; बैलांच्या साहाय्याने गिरीश नारखेडे यांची पारंपरिक पद्धतीने पेरणी
मामुराबाद | प्रतिनिधी
परिसरात समाधानकारक पावसाची हजेरी लागल्यानंतर मामुराबादसह परिसरातील शेतशिवारात खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सोयाबीन पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
मामुराबाद येथील शेतकरी गिरीश नारखेडे यांनी आपल्या शेतात बैलांच्या साहाय्याने पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी करून पारंपरिक शेती संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगातही बैलांच्या मदतीने केली जाणारी शेती परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
वेळेवर झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांच्या लागवडीत व्यस्त आहेत. यंदा पावसाने योग्य वेळी साथ दिल्याने सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नव्या आशा-अपेक्षांसह बळीराजाने खरीप हंगामाला सुरुवात केली असून, आगामी काळातही पावसाची साथ कायम राहिल्यास यंदाचा हंगाम समाधानकारक ठरेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
