Spread the love

साक्री तालुक्यातील सुरपन फाट्याजवळील घटना; तीन कोटींच्या पाच लक्झरी इलेक्ट्रिक कारांचे नुकसान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

साक्री, धुळे : चेन्नईहून गुजरातच्या दिशेने लक्झरी इलेक्ट्रिक कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरला साक्री तालुक्यातील सुरपन गाव फाट्याजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि साक्री अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, KL-01-AF-2477 क्रमांकाचा कंटेनर चेन्नईहून गुजरातच्या दिशेने पाच लक्झरी इलेक्ट्रिक कार घेऊन जात होता. या वाहनातील कारांची एकूण किंमत सुमारे तीन कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दुपारच्या सुमारास कंटेनरमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तात्काळ वाहन थांबवत साक्री अग्निशामक दलाला माहिती दिली.

माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग अधिक भडकण्यापासून रोखण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. आगीमुळे कंटेनरसह त्यामधील पाचही इलेक्ट्रिक कारांचे नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून साक्री पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version