Spread the love

निकाल तातडीने जाहीर करण्यासह पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणि मुदतवाढीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुणे, ता. २९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेल्फेअर (DLL & LW) परीक्षेचा निकाल अद्याप पोर्टलवर उपलब्ध नसल्याने तसेच पुनर्मूल्यांकन (Revaluation) प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, व्यावसायिक आणि मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप करत छावा स्वराज सामाजिक संस्थेने विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

संस्थेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांची भेट घेऊन निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत सविस्तर चर्चा केली. निवेदनात परीक्षेचे निकाल तातडीने जाहीर करावेत, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी तसेच पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

विद्यापीठाच्या परीक्षा व निकाल प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान होत असून त्याचा मानसिक ताणही विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे संस्थेने निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी छावा स्वराज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ शेख, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा शितल हुलावळे, पुणे शहराध्यक्ष गणेश कांबळे, पुणे जिल्हा सचिव अमित नलावडे तसेच पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष विजय माने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version