पंढरपूर वारीहून सुखरूप परतलेल्या वारकऱ्यांचा जळगाव रेल्वे स्थानकावर भावपूर्ण सत्कार; नियोजनाबद्दल प्रतापराव पाटील यांचेस्वागतासाठी रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी पंढरपूर वारीहून सुखरूप परतलेल्या वारकऱ्यांचा जळगाव रेल्वे स्थानकावर भावपूर्ण सत्कार; नियोजनाबद्दल प्रतापराव पाटील यांचे सर्वत्र कौतुक
पाळधी (ता. धरणगाव), प्रतिनिधी : आषाढी वारी पूर्ण करून पंढरपूरहून सुखरूप परतलेल्या वारकरी भाविकांचे जळगाव रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योजक अनिल कासट यांच्या पुढाकारातून आयोजित या स्वागत सोहळ्यात जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह वारीत सहभागी झालेल्या शेकडो वारकऱ्यांचा पुष्पहार घालून आणि टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करण्यात आला.
यंदा सलग तिसऱ्या वर्षी जीपीएस मित्रपरिवार आणि विकी बाबा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे आणि एसटीच्या माध्यमातून हजारो वारकरी पंढरपूर वारीसाठी रवाना झाले होते. संपूर्ण यात्रेचे नियोजन राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले होते. त्यांच्या नियोजनामुळे सर्व वारकरी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात वारी पूर्ण करून सुखरूप परतल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
जळगाव रेल्वे स्थानकावर वारकरी दाखल होताच उद्योजक अनिल कासट यांनी मित्रपरिवारासह त्यांचे पुष्पगुच्छ, हार आणि जयघोषात स्वागत केले. “विठ्ठल… विठ्ठल…”च्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरीच्या दर्शनाचे समाधान आणि स्वागतासाठी उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
यावेळी बोलताना जि.प. सदस्य प्रतापराव पाटील भावूक झाले. त्यांनी सांगितले की, “वारी ही केवळ यात्रा नसून ती संस्कार, शिस्त, सेवा आणि भक्तीचा महाउत्सव आहे. सर्व वारकऱ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दोन दिवस विठ्ठल नामस्मरण, भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात वारी पूर्ण केली. पांडुरंगाच्या कृपेने सर्वजण सुखरूप परतले, हीच सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. या यशस्वी आयोजनात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”
उपस्थितांनी प्रतापराव पाटील यांच्या नियोजन कौशल्याचे कौतुक करत, हजारो वारकऱ्यांची रेल्वे आणि एसटीद्वारे सुरक्षित वाहतूक, निवास आणि इतर सुविधांचे प्रभावी नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या स्वागत व सत्कार सोहळ्यास जीपीएस मित्रपरिवाराचे धनराज कासट, मुकेश भोई, प्रशांत झवर, चंदू पाटील, दिलीप माळी, भूषण महाजन, अनिल महाजन, आबा माळी, कल्पेश कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि नागरिक उपस्थित होते. भक्ती, आनंद आणि समाधानाने भरलेला हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
