Spread the love

पूर्व परीक्षा २०२६ उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; मुख्य परीक्षेसाठी ५० हजार, मुलाखतीसाठी २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन

नंदुरबार, प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा आणि मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. सन २०२६ मधील यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, पात्र उमेदवारांनी १७ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच ‘अमृत’च्या लक्षित गटातील उमेदवारांना मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि अधिकाधिक विद्यार्थी केंद्रीय नागरी सेवांमध्ये यशस्वी व्हावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपये आणि मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपये असे एकूण ७५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. या निधीचा उपयोग अभ्यास साहित्य, मार्गदर्शन वर्ग, निवास, प्रवास आणि इतर आवश्यक शैक्षणिक खर्चासाठी करता येणार आहे.

‘अमृत’च्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाजांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

इच्छुक उमेदवारांनी mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावरील पात्रता, अटी, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १७ जुलै २०२६ असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

योजनेसंदर्भातील सर्व अद्ययावत माहिती, पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि पुढील सूचना या केवळ ‘अमृत’च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी किंवा ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे, जिल्हा अमृत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय (नगरपालिका विभाग), नंदुरबार येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा आर्थिक आधार ठरणार असून, पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Share.
Leave A Reply

Exit mobile version