गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; चौकशीत आणखी एका मोटारसायकल चोरीची कबुली, तीन गुन्ह्यांचा उलगडा
मोटारसायकल चोरीप्रकरणी पोलिसांना मोठे यश • विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात • दोन चोरीच्या दुचाकी जप्त • चौकशीत तीन गुन्ह्यांची कबुली
धुळे, प्रतिनिधी : चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून चौकशीदरम्यान त्याने तीन ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री रोड परिसरातील रहिवासी साजीद अहमद शफिक अहमद सय्यद यांची सुमारे ५३ हजार रुपये किमतीची मोटारसायकल ३ जूनच्या रात्री ते ४ जूनच्या पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९४/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये नोंद करण्यात आला होता.
याचप्रमाणे, आविष्कार कॉलनीतील नवीद अन्सार शाह यांच्या घरासमोर उभी असलेली ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल २५ मेच्या रात्री ते २६ मेच्या सकाळीदरम्यान चोरीला गेली होती. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १७१/२०२६ दाखल करण्यात आला होता.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी पूर्व हुदको परिसरातून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईमुळे यापूर्वी नोंद असलेल्या दोन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांसह आणखी एका चोरीच्या गुन्ह्याचाही उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित चोरीच्या वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत.
मोटारसायकल चोरीच्या घटनांवर प्रभावी कारवाई करत अल्पावधीत गुन्ह्यांची उकल केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे.
ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विवेक पवार यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अविनाश वाघ, राहुल पाटील, अतिक शेख, शोएब बेग, सचिन पाटील, सिराज खाटीक आणि इंद्रजित सैराट यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
