Spread the love

पुनर्वसन न झाल्यास जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील जगन्नाथ नगर परिसरातील एका वृद्ध महिलेच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘बिऱ्हाड’ आंदोलन सुरू केले आहे. वृद्ध महिला मंडाबाई भाले यांनी आपल्या घरातील साहित्य आणि बकऱ्यांसह धुळे येथील क्यू माईन क्लब परिसरात ठिय्या देत महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जगन्नाथ नगर परिसरातील मंडाबाई भाले यांचे घर अतिक्रमण असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने ते पाडले. या कारवाईनंतर भाले कुटुंबीयांनी न्याय मिळावा म्हणून उपोषणही केले. मात्र, त्यानंतरही पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे संतप्त झालेल्या मंडाबाई भाले यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘बिऱ्हाड’ आंदोलन सुरू केले असून, तातडीने पुनर्वसन करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात आणि सामाजिक कार्यकर्ते तथा दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल यांनी महापालिका प्रशासनाला इशारा देत, वृद्ध महिलेचे तात्काळ पुनर्वसन न झाल्यास जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाबाबत महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. वृत्तातील आरोप आणि मागण्या या आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दाव्यांवर आधारित असून, संबंधित प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

Share.
Leave A Reply

Exit mobile version