सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या पाठपुराव्याला यश • मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचेही उत्तर • गतिरोधक, रिफ्लेक्टर व इशारा फलक उभारण्याची नागरिकांची मागणी
पोखरी चौफुलीवरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर • मुख्यमंत्री कार्यालयाची दखल • जिल्हाधिकाऱ्यांचे सकारात्मक उत्तर • सुरक्षात्मक उपाययोजनांची अपेक्षा • नागरिकांना दिलासा
धरणगाव (पाळधी) | प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाळधी खुर्द येथील पोखरी चौफुली (गायळ माता मंदिर परिसर) येथे सातत्याने घडणाऱ्या अपघातांची अखेर मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशांनंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेही संबंधित प्रकरणाची नोंद घेत आवश्यक कार्यवाहीसाठी ते संबंधित विभागाकडे पाठविल्याचे अधिकृत उत्तर दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या चौफुलीवर वारंवार अपघात होत असून अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. २६ जून रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन ज्येष्ठ नागरिक नीलकंठ पाटील गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाचे हाड मोडल्याने या चौफुलीवरील धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली.
या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री कार्यालय तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांना गुगल मॅप लोकेशनसह सविस्तर निवेदन ई-मेलद्वारे पाठवले होते. या निवेदनात चौफुलीवर गतिरोधक, रिफ्लेक्टर, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, इशारा सूचना फलक आणि अन्य सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्री सचिवालयाने या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेही या प्रकरणाची नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोखरी चौफुली परिसरातून दररोज हजारो वाहने वेगाने धावत असतात. याच मार्गावरून शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच आकाश बाम परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, वेगमर्यादा नियंत्रणाची कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने येथे सतत अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. योग्य वेळी उपाययोजना झाल्यास भविष्यातील अनेक अपघात टाळता येतील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी म्हणाले, “शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र केवळ पत्रव्यवहार न होता प्रत्यक्ष कामे होणे अधिक महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून गतिरोधक, रिफ्लेक्टर, इशारा फलक आणि अन्य आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने उभारावेत. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा विषय असल्याने याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.” मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे या चौफुलीवरील सुरक्षाविषयक उपाययोजनांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर लवकरच ठोस निर्णय होईल, अशी आशा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
