Spread the love

 

पावसाळ्यात चिखलामुळे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

 

भुसावळ (बोदवड) : बोदवड नगरपंचायत हद्दीतील गट क्रमांक ३०, साईनगर येथील रस्ता पूर्णपणे काळ्या मातीचा असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, चिखलामुळे रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले असून अनेकदा घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

या समस्येबाबत नगरपंचायतीकडे अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे गट क्रमांक ३०, साईनगर येथील रस्त्याची तातडीने स्थळ पाहणी करून कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट किंवा डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कडक मुरूम व खडी टाकून रोलरद्वारे दाबणी करून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास साईनगरमधील रहिवासी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version