‘सेवार्थ’ प्रणालीत बनावट बेसिक एरिअर्स दाखवून स्वतःच्या खात्यात वळवली रक्कम; आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मोठा आर्थिक घोटाळा • १ कोटी ५५ लाखांचा अपहार • चार लोकसेवकांविरोधात गुन्हा • सर्व आरोपी अटकेत • आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
धुळे | प्रतिनिधी :
धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १ कोटी ५५ लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेतनाच्या ‘बेसिक एरिअर्स’च्या नावाखाली ऑनलाईन ‘सेवार्थ’ प्रणालीमध्ये बेकायदेशीर फेरफार करून शासनाची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवल्याप्रकरणी चार लोकसेवकांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले कनिष्ठ श्रेणी लिपीक मनोजगिर जगदिशगिर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपीक जगदीश देविदास सोनवणे, एएसआय नरेशगिर सुरेशगिर गोसावी आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज अशोक खोंडे यांनी संगनमत करून हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे ‘बेसिक एरिअर्स’ देय नसताना, त्यांनी सेवार्थ प्रणालीमध्ये परस्पर खोटी नोंद करून वेतनाची रक्कम वाढवली. त्यानंतर ही वाढीव रक्कम नियमित पगारासोबत स्वतःच्या बँक खात्यांमध्ये जमा करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकारात शासनाचे १ कोटी ५५ लाख रुपये बेकायदेशीररीत्या वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात १ जुलै २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना बुधवारी रात्री अटक केली. सर्व आरोपी पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथेच कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, अपहाराची संपूर्ण व्याप्ती, अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच शासनाच्या निधीचा गैरवापर आणखी कुठल्या माध्यमातून करण्यात आला आहे का, याचा सखोल तपास केला जात आहे. या आर्थिक घोटाळ्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून, शासकीय आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकता आणि ऑनलाईन वेतन प्रणालीच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
