वारकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!, वारकऱ्यांच्या सुविधा व नियोजनासाठी शासन सज्ज
मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत होणार निधीचे वितरण; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या तयारीला वेग
▪️ १,४०० मानाच्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान
▪️ मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वितरण ▪️
पुणे | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या १,४०० मानाच्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली.
आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात असताना शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील वारकरी संप्रदायात समाधानाचे वातावरण आहे. दरवर्षी लाखो वारकरी संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरच्या दिशेने पदयात्रा करत असतात. या दिंड्यांच्या व्यवस्थापनासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन शासनाने आर्थिक मदतीचा निर्णय कायम ठेवला आहे.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक समतेच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०२४ मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.
यंदा राज्यातील दहा मानाच्या पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेला २.८० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे. अनुदानाचे वितरण मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या कामात व्यस्त असतानाच पंढरीच्या वारीची लगबगही सुरू झाली आहे. बुलढाणा येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ झाली असून जळगाव येथून संत मुक्ताईंच्या पालखीचेही प्रस्थान झाले आहे. लवकरच देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याही पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.
वारीदरम्यान लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, आपत्कालीन सेवा आणि निवास व्यवस्थेचे व्यापक नियोजन सुरू केले आहे. विविध विभागांच्या समन्वयासाठी आढावा बैठका घेतल्या जात असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
▪️ एकूण २.८० कोटींचा निधी मंजूर
शासनाच्या या निर्णयामुळे दिंड्यांच्या व्यवस्थापनाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून, वारकरी परंपरेच्या जतन आणि संवर्धनासाठी सरकारची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे. आर्थिक सहाय्यासह सुविधा आणि नियोजनावर भर दिल्याने यंदाची आषाढी वारी अधिक सुकर आणि सुव्यवस्थित होईल, असा विश्वास वारकरी संप्रदायातून व्यक्त केला जात आहे.
