Spread the love

धरणगाव–अमळनेर–धुळे–मालेगाव–नाशिक मार्गे धावणार बस; शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि दर्शनासाठी प्रवाशांना मोठा दिलासा

धरणगाव–त्र्यंबकेश्वर थेट एसटी सेवा सुरू • प्रवासी मंडळाच्या पाठपुराव्याला यश • प्रवाशांचा वेळ, पैसा आणि त्रास होणार कमी • बसस्थानकावर उत्साहात शुभारंभ

धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील) :

धरणगाव ते त्र्यंबकेश्वर या बहुप्रतीक्षित थेट एसटी बससेवेचा शुक्रवार (दि. ३) रोजी धरणगाव बसस्थानकावर उत्साहात शुभारंभ करण्यात आला. धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बससेवा सुरू झाल्याने परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

धरणगाव–अमळनेर–धुळे–मालेगाव–नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वरपर्यंत धावणाऱ्या या बसचे दुपारी २.४५ वाजता धरणगाव बसस्थानकातून प्रस्थान झाले. शुभारंभप्रसंगी बसचे चालक भूषण मराठे, वाहक व्ही. जी. चौधरी तसेच वाहतूक नियंत्रक जितेंद्र सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजप नेते ॲड. संजय महाजन यांनी या बससेवेमुळे नाशिक येथे शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ, पैसा आणि प्रवासातील गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे सांगितले.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांनी ही बससेवा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश मिळाल्याचे नमूद केले.

शुभारंभ कार्यक्रमास प्रवासी मंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version