खताचा ट्रक खाली करताना चालकाचा अंदाज चुकला; पाळधी पोलिसांकडून चालक ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे अपघात • ट्रकच्या चाकाखाली आल्याने ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू • चालक पोलिसांच्या ताब्यात • पाळधी पोलिसांचा तपास सुरू
धरणगाव | प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावात खताचा ट्रक मागे घेत असताना ट्रकच्या चाकाखाली आल्याने ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकलग्न येथील एका कृषी केंद्रात खताचा ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-२०११) खाली केला जात होता. याचवेळी ट्रकच्या मागील बाजूस उत्तम मोहन पाटील (वय ७५) हे बसले होते. ट्रक चालकाला त्यांच्या उपस्थितीचा अंदाज न आल्याने ट्रक मागे घेतला गेला आणि उत्तम पाटील हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पाळधी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मदतकार्य केले. ट्रक चालक शेख अमिन शेख नबी (रा. दूध फेडरेशन परिसर, जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या स्थानिक शाखेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत उत्तम पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि जावई असा परिवार आहे. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
