आगीत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीचे आश्वासन, अग्निशमन दलाचा विशेष सत्कार
संत सखाराम महाराज संस्थानाला पालकमंत्र्यांची भेट • पुनर्बांधणीसाठी शासनाकडून मदतीचे आश्वासन • ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी पाठपुरावा • अग्निशमन दलाच्या धाडसाचा गौरव
अमळनेर | प्रतिनिधी :
अमळनेरचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज संस्थानात लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी संस्थानाला भेट दिली. मंदिर परिसराची पाहणी करून त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला तसेच संस्थानचे विश्वस्त आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संत सखाराम महाराज हे अमळनेरचे ग्रामदैवत असून या पवित्र स्थळी घडलेली आग अत्यंत दुर्दैवी आहे. शासन या संकटाच्या काळात संस्थानच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी संत सखाराम महाराज संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करून मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे जतन व संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थानातील आगीत सुमारे ४०० वर्षे जुना सागवान लाकडाचा ऐतिहासिक सभामंडप पूर्णपणे जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणाची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त प.पू. प्रसाद महाराज (गुरु ज्ञानेश्वर महाराज), विश्वस्त रविकांत देशमुख, जयंत मोडक, एकनाथ सातपूरकर, प्रसाद नाईक, सल्लागार राजेंद्र भामरे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी, सेवेकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते.
अग्निशमन दलाचा गौरव
आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून मोठी हानी टाळणाऱ्या अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष कौतुक केले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी तसेच कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव, आनंद झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, रफीक पठाण, आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर आणि अजय बिऱ्हाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
