Spread the love

मंडाबाई भाले, दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाच दिवसांच्या आंदोलनाला यश; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

पाच दिवसांचे बिऱ्हाड आंदोलन यशस्वी • घरासाठी जागा देण्याचे आश्वासन • मुलाला नोकरी देण्याचा निर्णय • मनपा प्रशासनाचे लेखी पत्र • आंदोलन स्थगित

धुळे | प्रतिनिधी :

धुळे महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या पाच दिवसांच्या बिऱ्हाड आंदोलनास अखेर यश मिळाले असून, मनपा प्रशासनाने वृद्ध महिला मंडाबाई भाले यांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या मुलाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांनी बिऱ्हाड आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

गेल्या महिनाभरापूर्वी धुळे शहरातील जगन्नाथ नगर परिसरात अतिक्रमण असल्याच्या कारणावरून महानगरपालिकेने मंडाबाई भाले यांचे घर जमीनदोस्त केले होते. त्यानंतर न्याय मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र समाधानकारक निर्णय न झाल्याने दक्ष पत्रकार संघ, वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात आले.

पाच दिवस सुरू असलेल्या आंदोलनानंतर मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रशासनाने मंडाबाई भाले यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत घरासाठी जागा आणि त्यांच्या मुलाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनाच्या यशामुळे मंडाबाई भाले तसेच आंदोलनात सहभागी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. महिनाभराच्या संघर्षानंतर न्याय मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मंडाबाई भाले, बापू बागुल, शंकर खरात, जितेंद्र खैरनार, ललित भाले, सागर धिवरे, बॉबी नागमल आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version