Spread the love

धरणातून ४९,५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे प्रशासनाची सतर्कतेचे आवाहन

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले • तापी नदीत ४९,५८२ क्युसेक विसर्ग • नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा • पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस • प्रशासन हायअलर्टवर

भुसावळ | प्रतिनिधी :

जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी वेगाने वाढली आहे. आज सकाळी १० वाजेच्या अहवालानुसार धरणाचे २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात ४९ हजार ५८२ क्युसेक (१,४०४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने हायअलर्ट जारी करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही तासांत धरण परिसरात २८ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पाऊस ७६ मिमीवर पोहोचला आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी २१२.१८० मीटर असून, एकूण क्षमता २१४.००० मीटर आहे. धरणात सध्या २८९.०० दलघमी (७४.४८ टक्के) एकूण पाणीसाठा असून, त्यापैकी १५६.०० दलघमी (६१.१८ टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातील २२ वक्राकार दरवाजे उघडून तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय मुख्य कालव्यातूनही ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) वेगाने विसर्ग सुरू असून, उजवा कालवा सध्या बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्हाणपूर (५२ मिमी), देडतलाई (५८.२ मिमी), टेक्सा (२७.२ मिमी), एरंडी (३२ मिमी), चिखलदरा (८२.२ मिमी), लोहारा (२१ मिमी) यांसह विविध भागांत एकूण ३८८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हतनूर परिसरातही ८८ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तापी नदीच्या काठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version