Spread the love

लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांच्या तक्रारीनंतर विभागीय सहनिबंधकांना तातडीने कार्यवाहीचे आदेश; कथित नियमबाह्य कारभाराच्या चौकशीला वेग

जळगाव जिल्हा बँकेप्रकरणी तक्रारीची दखल • सहकार आयुक्तांचे चौकशीचे निर्देश • विभागीय सहनिबंधकांना कार्यवाहीचे आदेश • बँकिंग कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप • सहकार क्षेत्राचे लक्ष चौकशीकडे

जळगाव | प्रतिनिधी :

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या कथित नियमबाह्य कारभाराबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दखल घेतली असून, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकनियुक्त सरपंच तथा तक्रारदार सुरेशआप्पा गो. पाटील (झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी ३० जून २०२६ रोजी सहकार आयुक्तांकडे सादर केलेल्या अर्जात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचना तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.

दि. २ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, सहकार आयुक्त कार्यालयाने संबंधित तक्रार विचारात घेत विभागीय सहनिबंधकांना शासनाच्या धोरणांनुसार आणि लागू नियमांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबत अर्जदाराला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारीमध्ये बँकेतील कथित नियमबाह्य कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व संचालकांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घडामोडीनंतर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत सहकार क्षेत्रात नव्याने चर्चा सुरू झाली असून, विभागीय स्तरावर होणाऱ्या चौकशी व त्यानंतरच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version