Spread the love

शिरपूरच्या संशयिताला शिंदखेडा येथे सापळा रचून पकडले; ₹१८,४०० किमतीचा मुद्देमाल जप्त, पुरवठा साखळीचा शोध सुरू

धुळे | प्रतिनिधी

मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक कफ सिरपची विनापरवाना विक्री रोखण्यासाठी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत १६० कफ सिरपच्या बाटल्यांसह एका संशयिताला अटक केली आहे. शिंदखेडा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील कुमरेज फाट्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत ₹१८ हजार ४०० इतकी आहे.

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गुंगीकारक औषधांची बेकायदेशीर विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाने कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण वसंत सकट (रा. मच्छी बाजार, शिरपूर) हा सुरत येथून शिंदखेडा मार्गे शिरपूरकडे गुंगीकारक कफ सिरपच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर राजपत्रित अधिकारी व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत कुमरेज फाट्याजवळ सापळा रचण्यात आला.

संशयिताला अडवून त्याच्याकडील दोन काळ्या रंगाच्या बॅगांची तपासणी केली असता, त्यामध्ये मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या कफ सिरपच्या १६० बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची एकूण किंमत ₹१८,४०० असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७८, तसेच गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील संबंधित कलमे आणि औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम, १९४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दीपक ढोके करीत असून, आरोपीने हे कफ सिरप नेमके कोठून आणले, त्यामागील पुरवठा साखळी कोणती आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि दीपक ढोके तसेच पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, राहुल गिरी, प्रशांत माळे आणि संजय सुरसे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गुंगीकारक औषधांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधातील या कारवाईमुळे अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version