Spread the love

झुरखेड्याचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांच्या तक्रारीनंतर हालचाल; बँकिंग कायदा, RBI मार्गदर्शक सूचना आणि शासन आदेशांच्या उल्लंघनाच्या आरोपांची चौकशी होणार

सहकार आयुक्तांची तातडीची दखल • विभागीय सहनिबंधकांना चौकशीचे निर्देश • बँकिंग नियमांच्या उल्लंघनाचा आरोप • सहकार क्षेत्राचे लक्ष चौकशीकडे

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. संदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी गंभीर दखल घेत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्याने चर्चांना उधाण आले आहे.

झुरखेडा (ता. धरणगाव) येथील लोकनियुक्त सरपंच तथा तक्रारदार सुरेशआप्पा गो. पाटील यांनी ३० जून २०२६ रोजी सहकार आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या अर्जात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचना तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध आदेशांचे कथित उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दि. २ जुलै २०२६ रोजी सहकार आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाला धोरणे, शासन निर्णय आणि लागू नियमांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबत अर्जदारास कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रारीमध्ये बँकेतील कथित नियमबाह्य कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि संचालकांवर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घडामोडीनंतर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून, विभागीय सहनिबंधकांकडून होणाऱ्या चौकशीचा अहवाल आणि त्यानंतर होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version