११० वर्षांची परंपरा लाभलेल्या तालुका ‘ब’ दर्जाच्या वाचनालयात आर्थिक अहवाल, प्रगतीचा आढावा आणि वाचकांच्या सूचनांवर होणार चर्चा
जळगाव | प्रतिनिधी
नशिराबाद येथील ११० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या आणि तालुका ‘ब’ दर्जाच्या सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सभेची सुरुवात संस्थेशी संबंधित दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून शोक प्रस्तावाने होणार आहे. त्यानंतर मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी दिली जाईल.
सभेमध्ये संस्थेचा वार्षिक जमा-खर्चाचा हिशोब सादर करण्यात येणार असून आगामी वर्षाचे अंदाजपत्रकही मांडले जाणार आहे. तसेच वर्षभरात झालेल्या कमी-अधिक खर्चास मंजुरी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय संस्थेच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा सविस्तर प्रगती अहवाल सभासदांसमोर मांडण्यात येईल. लेखापरीक्षकांनी उपस्थित केलेल्या शंका व आक्षेपांवर चर्चा करून त्यांचे निरसन करण्यात येणार आहे.
वाचनालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके उपलब्ध करून देण्यासंदर्भातील वाचकांच्या सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पितांबर आमोदकर, कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी आणि सचिव ॲड. प्रदीप मुरारी देशपांडे यांनी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सभेच्या कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
