SIR – २०२६ अभियानासाठी बीएलए-२ व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; मतदार यादी अचूक करण्याचे आवाहन
धरणगाव (वाल्मिक पाटील) : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी आयोजित मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) २०२६, अंतर्गत बीएलए-२ व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर धरणगाव येथील श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आगामी मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख, बीएलए-१ प्रमुख प्रा. सी. के. पाटील, प्रशिक्षक ॲड. शहेजाद खान आणि ॲड. मोहतशम रजा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय जनकवार यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षण शिबिराचा उद्देश स्पष्ट केला.
गौरव चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला, तर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशिक्षण सत्रात योगेश पाटील, ॲड. अविनाश भालेराव, प्रा. सी. के. पाटील, महेश पाटील, बाबा देशमुख, ॲड. शहेजाद खान आणि ॲड. मोहतशम रजा यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेतील नियम, आवश्यक कागदपत्रे, नवमतदार नोंदणी, त्रुटी दुरुस्ती, नावे समाविष्ट व वगळण्याची प्रक्रिया तसेच बीएलए-२ कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदानाचे अधिकार सुरक्षित राहावेत आणि मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात जनजागृती करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेशआण्णा भागवत, रामचंद्र महाजन, सलीम बेलदार, महेश (बंटी) पवार, दिनेश पाटील, योगेश येवले, गौरव चव्हाण, जितेंद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश (बंटी) पवार यांनी केले, तर सुनील सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने आगामी जनजागृती अभियानाला बळ मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
