Spread the love

SIR मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी BLA बैठकीचे आयोजन; कार्यकर्त्यांना मानधनाचे वितरण, घरभेटी व अचूक मतदार पडताळणीवर भर

जळगाव ग्रामीणमध्ये SIR मोहिमेचा अंतिम टप्पा; BLA कार्यकर्त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन

पाळधी/धरणगाव | प्रतिनिधी

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेच्या अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पाळधी येथील सुगोकी रिसॉर्टमध्ये शिवसेनेच्या बूथ लेव्हल एजंट (BLA) कार्यकर्त्यांची मार्गदर्शन बैठक उत्साहात पार पडली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत, “BLA हा प्रत्येक बूथचा किल्लेदार आणि समन्वयक आहे. BLO सोबत खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम करा आणि लोकशाहीच्या सेवेसाठी सज्ज व्हा,” असे आवाहन केले.

पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दीड लाखांहून अधिक BLA कार्यकर्त्यांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत SIR मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील नियोजन, घरभेटी, नवमतदार नोंदणी, स्थलांतरित नागरिकांशी संपर्क, BLO-BLA समन्वय आणि प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा Enumeration Form (EF) भरून त्याचे डिजिटायझेशनही करण्यात आले.

स्वीय सहाय्यक प्रथमेश मोहोड यांनी सादरीकरणाद्वारे BLA कार्यकर्त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची माहिती दिली. जळगाव जिल्ह्यात SIR मोहिमेच्या अंमलबजावणीत जळगाव ग्रामीण मतदारसंघ तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, मॅपिंगचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष घरभेटींचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. घर बंद असल्यास पुन्हा भेट द्यावी, बाहेरगावी असलेल्या नागरिकांशी संपर्क साधावा तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्थलांतरित महिला आणि नवमतदारांपर्यंत स्वतःहून पोहोचून अचूक माहिती नोंदवावी. अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीत मागील बैठकीत दिलेला शब्द पाळत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील BLA कार्यकर्त्यांना मानधनाचे वितरण करण्यात आले. विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेत जबाबदारीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जळगाव तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी, तर आभार धरणगाव तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी मानले.

यावेळी युवा नेते प्रतापराव पाटील, जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील, अनिल पाटील, सचिन पवार, रमेश दूध संघाचे संचालक रमेश (आप्पा) पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील तसेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील BLA, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version