Spread the love

जळगाव पंचायत समितीत समग्र शिक्षा अभियानाचा कार्यक्रम; ३८ विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साहित्य, १५ मतिमंद विद्यार्थ्यांना एमआर किटचे वितरण

समग्र शिक्षा अभियानांतर्गत ५३ दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साहित्यांचे वाटप

जळगाव | प्रतिनिधी

“शासन दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र केवळ शासनानेच नव्हे, तर समाजातील सेवाभावी संस्था, उद्योग आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला पाहिजे. दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास हेच सर्वात मोठे समाधान आहे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील ३८ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, सीपी व्हीलचेअर, डिजिटल श्रवणयंत्रे, टीएलएम किट, रोलॅटर, वॉकिंग स्टिक तसेच इतर सहाय्यभूत साहित्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय १५ मतिमंद विद्यार्थ्यांना विशेष एमआर किटचेही वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी हा समाजाची अमूल्य संपत्ती आहे. योग्य संधी, आधुनिक साधने आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाल्यास दिव्यांग विद्यार्थीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर समानतेच्या, सन्मानाच्या आणि विश्वासाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी केले. त्यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांची उद्दिष्टे तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सुशील पवार यांनी केले.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, माजी सभापती पती जनाआप्पा कोळी, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, अल्लाउद्दीन बेलदार, विजय पवार यांच्यासह समग्र शिक्षा अभियान व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version