अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कोकण विभागीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष; सामाजिक, पर्यावरण, व्यसनमुक्ती आणि संघटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान
मुरबाड | प्रतिनिधी
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि कोकण विभागीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संजय हंडोरे पाटील यांचा ५ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत असून, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जात आहे. शिवछत्रपतींच्या विचारांना जीवनाचे ध्येय मानत त्यांनी ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, पत्रकार संघटन आणि समाजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील भादाणे या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय हंडोरे पाटील यांनी लहानपणापासूनच धाडसी आणि परोपकारी वृत्ती जोपासली. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी दरड दुर्घटनेत अडकलेल्या तिघांना वाचविणे आणि १६व्या वर्षी विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविणे, या घटनांमुळे त्यांची धैर्यवान व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण झाली.
व्यसनमुक्ती, ग्रामविकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार
साई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी जवळपास दोन दशके व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केले. सरपंच म्हणून कार्यरत असताना गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली. महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळावा यासाठी घरपट्टीवर पती-पत्नीची संयुक्त नोंद करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी राबविली.
पर्यावरण संवर्धनासाठी सुमारे ३० हजार साग वृक्षांची लागवड, युवकांमध्ये वृक्षसंवर्धनाची जनजागृती तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ची राज्यभर चर्चा
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला. ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झालेला हा उपक्रम राज्यासह देशभरातील अनेक शाळांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचा विविध राष्ट्रीय मंचांवर गौरवही करण्यात आला आहे.
संघटन आणि सामाजिक चळवळीतील सक्रिय नेतृत्व
स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी कोकण विभागीय पत्रकार संघाची स्थापना करून त्यांनी सातत्याने आवाज उठविला. कला क्षेत्रातही ते फ्रेंड्स फिल्म क्रिएशनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
युवकांसाठी व्यायामशाळा चळवळ
युवकांनी पोलीस, सैन्य आणि सुरक्षा दलात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे या उद्देशाने त्यांनी ठाणे जिल्हा सार्वजनिक व्यायामशाळा संघाची स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नातून सुमारे ३५० गावांमध्ये व्यायाम साहित्य आणि व्यायामशाळांसाठी निधी उपलब्ध झाला.
राष्ट्रीय स्तरावर समाज संघटन
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर संघटन विस्ताराचे काम केले. शिर्डी, दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांसह विविध राज्यांतील राष्ट्रीय अधिवेशनांत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. २०२६ मध्ये जबलपूर येथे ‘कुर्मी जोडो अभियान’ची घोषणा करून समाज एकत्रीकरणाची नवी चळवळ सुरू केली.
महिला, युवक, उद्योग, मीडिया, साहित्य, कृषी आणि पुरोहित महासभा अशा विविध विभागांद्वारे संघटन अधिक सक्षम करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे.
सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि लोकाभिमुख कार्यामुळे संजय हंडोरे पाटील यांनी सामाजिक व सार्वजनिक जीवनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
