Spread the love

अल्प पावसातही तासनतास वीज गायब; नागरिक त्रस्त, कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी करत जनआंदोलनाचा इशार

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील नंदगाव, पिलखेडा, नांद्रा आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोणतेही वादळ-वारे नसताना आणि अल्प पाऊस पडत असतानाही तासनतास वीज गायब होत असल्याने महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून ज्येष्ठ नागरिक, बालके आणि रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नानाश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल सोनवणे यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, “पावसाचे प्रमाण कमी असताना आणि कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसताना वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर बाब आहे. परिसरातील वीज कर्मचारी आणि महावितरण प्रशासन नेमकी कोणती खबरदारी घेत आहे?” असा सवाल उपस्थित केला.

त्यांनी सांगितले की, मागील आठवड्यात किरकोळ पावसानंतर तब्बल तीन वेळा संपूर्ण रात्रभर वीजपुरवठा खंडित राहिला. “पाऊस पडतो तासभर आणि लाईट जाते रात्रभर,” अशी परिस्थिती सध्या नंदगाव-पिलखेडा परिसरात असल्याचा आरोप त्यांनी केला.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नानाश्री फाऊंडेशनतर्फे देण्यात आला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version